'ई-ग्रंथालय' चळवळीसाठी जिल्हा परिषद सकारात्मक - प्रमोद कामत

'ई-ग्रंथालय' चळवळीसाठी जिल्हा परिषद सकारात्मक - प्रमोद कामत

 

सावंतवाडी

 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १२८ शासनमान्य ग्रंथालयांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तिथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'ई-ग्रंथालय' चळवळ राबवणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,उपाध्यक्ष दादा साईल आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालये संगणकीकृत करण्यासाठी आणि त्यांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिले. जिल्ह्यात २५, ५० आणि अगदी १०० वर्षांपासून कार्यरत असलेली अनेक जुनी ग्रंथालये आहेत. मात्र, आजही अनेक ग्रंथालये भाड्याच्या जागेत चालवली जात असल्याने त्यांना आधुनिक सुविधा पुरवण्यात मर्यादा येत आहेत. या समस्या मांडताना ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी मागणी केली की, ज्या गावांमध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने वर्गखोल्या रिकाम्या आहेत, त्या खोल्या ग्रंथालयांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच ग्रामपंचायतीमार्फत शासकीय भूखंड मिळवून दिल्यास ग्रंथालयांना स्वतःची इमारत बांधता येईल. ग्रंथालयांना केवळ जागाच नव्हे, तर आधुनिक बनवण्यासाठी संगणक, सॉफ्टवेअर, खुर्चा, टेबल, इन्व्हर्टर, प्रिंटर आणि स्पीकर यांसारख्या भौतिक सुविधांचीही गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हे साहित्य उपलब्ध करून दिल्यास डिजिटल लायब्ररी, अभ्यासिका, तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी स्वतंत्र दर्जेदार विभाग निर्माण करणे शक्य होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रमोद कामत यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे जिल्हा प्रगत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आधुनिक काळात ग्रंथालये हायटेक असणे आवश्यक असून, ही बाब त्यांच्या कानावर घातली जाईल. शाळांमधील रिकाम्या खोल्यांचा पाच वर्षांचा आढावा घेऊन सर्वे केला जाईल आणि जिथे शक्य आहे तिथे ग्रंथालयांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. उपाध्यक्ष दादा साईल यांनीही पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन स्तरावरून ग्रंथालयांना गतिमान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, संचालक ॲड. संतोष सावंत, गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, प्रवीण भोगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.