कणकवलीत जनता दरबारात ९६ निवेदने......गणेशोत्सवापूर्वी सर्व कामे मार्गी लावण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश
कणकवली
तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात सोमवार, दि. १ सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.या जनता दरबारात एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली, यामध्ये ४२ लेखी आणि ५४ तोंडी निवेदनांचा समावेश आहे. गणेशोत्सवापूर्वी ही सर्व कामे तातडीने मार्गी लावून ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या दरबारात विविध विभागांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राप्त निवेदनांमध्ये महावितरणकडे २२, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २३, एसटी महामंडळाकडे १६, आरोग्य विभागाकडे १४, बीएसएनएलकडे ५, तर इतर विभागांकडे १६ निवेदने प्राप्त झाली.नागरिकांनी वीजपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, एसटी बसच्या फेऱ्या, आरोग्य सेवा तसेच बीएसएनएलच्या दूरसंचार सुविधांबाबत विविध समस्या मांडल्या. काही भागांमध्ये वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांकडे नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यावर आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या.तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याबाबतही चर्चा झाली. उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, आवश्यक मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला.या जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज भोंगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयतीलाल भांबरे, एसटी विभाग नियंत्रक प्रदीप घोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
konkansamwad 
