वेंगुर्ला नगरपरिषदेचा मोठा निर्णय......मोकाट जनावरे थेट ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवणार

वेंगुर्ला नगरपरिषदेचा मोठा निर्णय......मोकाट जनावरे थेट ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवणार

वेंगुर्ला

 

      वेंगुर्ला शहरात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. तसेच वाहतूक आणि स्वच्छतेवरही परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने कडक पाऊल उचलले आहे.नगरपरिषदेमार्फत रस्त्यांवर आढळणाऱ्या सर्व मोकाट जनावरांना पकडण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत पकडलेली सर्व जनावरे थेट गोशाळेत हलवण्यात येतील. विशेष म्हणजे यासाठी मालकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.दरम्यान, रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रमही राबवला जात आहे. शहरातील भटक्या गायी, वासरे आणि बैल यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट (रेडियम पट्टे) बांधण्यात येत आहेत. त्यामुळे अंधारातही वाहनांच्या लाईटमध्ये ही जनावरे चालकांना स्पष्ट दिसतील आणि अपघात टाळता येतील.नगरपरिषदेने सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली जनावरे मोकाट न सोडता सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत. जर जनावरांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा वाहतुकीला अडथळा आला, तर संबंधित मालकावर महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम 1965 आणि घनकचरा व्यवस्थापन उपविधी 2015 नुसार कडक कारवाई करण्यात येईल.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.