५९ व्या युवा महोत्सवात एस.आर.एम. महाविद्यालयाचे सुयश
कुडाळ
युवकांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व उंचावण्यासाठी युवा महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नेहमीप्रमाणे यावर्षीही संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात एकोणीस विविध कलाप्रकारांत सहभाग घेऊन त्यापैकी अकरा कलाप्रकारांत प्राथमिक स्पर्धेत सुयश मिळवत मुंबई येथे संपन्न होणाऱ्या ५९ व्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी गाठली आहे. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज, सावंतवाडी येथे नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली. सलग दोन वर्षे मुंबई विद्यापीठात पखवाज वादनात सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या श्रुतिका मोर्ये हिने यंदाही प्राथमिक फेरीत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. सुचिता मांजरेकर ही मराठी कथाकथन स्पर्धेत प्रथम आली आहे. श्रुती सावंत या विद्यार्थिनीने भावगीत स्पर्धेत द्वितीय, नाट्यगीत स्पर्धेत द्वितीय तर शास्त्रीय गायनात तृतीय क्रमांक पटकावला. भूषण मांजरेकर हा बासरी वादनात (सूरवाद्य) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. ललित कलेमध्ये अवधूत आचरेकर याने मातीकामात द्वितीय, रांगोळीमध्ये तृतीय तसेच कोलाज स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. मराठी वादविवाद स्पर्धेत सुचिता मांजरेकर व अदिती राजध्यक्ष यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. पाश्चात्य संगीत गायनात तेजस गावडे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. हे सर्व स्पर्धक विद्यार्थी अंतिम स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या सुयशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, क.म.शि.प्र.मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालक आदींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. एम.एन. जांबळे, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य, विद्यार्थी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
konkansamwad 
