कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह उत्साहात साजरा
कणकवली,
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेनिमित्त २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत पोलीस रेजिंग डे सप्ताह कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक पवन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडने, पोलीस कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, महिला पोलिस नाईक विनया सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग कळत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात सिंधुदुर्ग पोलीस श्वान पथकाने प्रात्यक्षिक सादर केले. श्वान पथकातील निखिल चव्हाण यांनी श्वान पथकाची कार्यपद्धती व गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका याबाबत माहिती दिली. तसेच बॉम्ब शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल भगवान बोगटे व पोलिस कॉन्स्टेबल निखिल कुहाडे, यांनी बॉम्ब शोध पथकाच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी भरोसा सेल, ज्येष्ठ नागरिक सेवा, विशेष पोलीस बाल पथक, महिलांच्या सुरक्षिततेसाठीची २४४७ महिला हेल्पलाईन, तसेच डायल ११२ या आपत्कालीन सेवांबाबत महिला पोलीस सहाय्यक फौजदार निकिता येडवे व पोलिस कॉन्स्टेबल धुमाळे यांनी सविस्तर माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ चा प्रभावी वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.तसेच रायफल पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राणे व पोलीस कॉन्स्टेबल सावंत यांनी रायफल हाताळणी व वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली.या उपक्रमासाठी एस.एम.एस. स्कूल कणकवली, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, राबले शाळा नं. १ कणकवली, जि. प. प्राथमिक शाळा कलमठ बाजारपेठ येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांच्यात विशेष उत्सुकता व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ रोजी झाली असून त्या स्मरणार्थ पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज, पोलिसांची भूमिका व जबाबदाऱ्या समजावून देण्याचा प्रयत्न केला जातो.पोलीस रेजिंग डे सप्ताहामुळे पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती निर्माण झाली, असे यावेळी दिसून आले.

konkansamwad 
