राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत संस्कृती मोरजकरची चमकदार कामगिरी
विरार
STAIRS STATE YOUTH GAMES – Western Maharashtra Karate Championship 2025-26 या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कुमारी संस्कृती संजय मोरजकर हिने दोन पदके जिंकून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ही स्पर्धा ३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी ग्रीन पॅलेस रिसॉर्ट, अर्नाळा बीच, विरार येथे आयोजित करण्यात आली होती.
दोन पदकांसह चमकदार कामगिरी
संस्कृतीने अंडर-१५ वयोगटातील ३५ किलो वजन गटात कुमिते प्रकारात सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच काता प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत ब्रॉन्झ मेडल मिळवले. संस्कृतीच्या या यशामध्ये तिचे प्रशिक्षक श्री. किरण देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गावाचा अभिमान वाढवला
संस्कृतीचे वडील श्री. संजय उर्फ सनी मोरजकर हे मौजे सखैलेखोल गावाचे पोलीस पाटील असून मुलीच्या या यशाने संपूर्ण गावाचा अभिमान वाढविला आहे. या स्पर्धेतील उज्वल कामगिरीच्या आधारे संस्कृतीची पुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून ती स्पर्धा दिल्ली येथे होणार आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
संस्कृतीच्या या यशाबद्दल प्रशिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील स्पर्धांतही ती आणखी मोठे यश संपादन करील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

konkansamwad 
