परप्रांतीयांना कोण पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर मनसेची भूमिका स्थानिकांच्या बाजूने : आशिष सुभेदार.

परप्रांतीयांना कोण पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर मनसेची भूमिका स्थानिकांच्या बाजूने : आशिष सुभेदार.

सावंतवाडी.

    स्थानिक टेम्पो चालक मालकांना डावलून येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय मुकादमांच्या मागे भाजपाचे पदाधिकारी आहेत. मतावर डोळा ठेवून त्यांच्याकडून हा प्रकार सुरू आहे, असा आरोप मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे. दरम्यान अशाच प्रकारे स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कोण पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर मनसेची भूमिका स्थानिकांच्या बाजूने असेल प्रसंगी आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
   सावंतवाडी शहरातील टेम्पो चालक-मालक संघटना यांच्या स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद रंगला आहे. परप्रांतातून आलेल्या मुकादम व अन्य लोकांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करू नये. त्याला आपला तीव्र विरोध राहील, अशी भूमिका स्थानिक लोकांची आहे तर आम्हाला न्याय द्यावा, आम्ही आमचा व्यवसाय करतो, असे पोलिसांसमोर सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन्ही गटात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना म्हणावे तसे यश आलेले नाही. मात्र या सर्व प्रकारामागे भाजपातील काही पदाधिकारी असल्याचा संशय आहे. काही परप्रांतीय पदाधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा प्रकार भाजप पदाधिकाऱ्यांनी थांबवावा, अन्यथा खळखट्याच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असे सुभेदार यांनी म्हटले आहे.