ओरोस येथे कला शिक्षकांची कार्यशाळा संपन्न.
सिंधुदुर्ग.
केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय उल्हास मेळावा या महिण्याच्या अखेरीस प्रस्तावित आहे.या मेळाव्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यास स्वतंत्र स्टॉल मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.या राज्यस्तर मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), सिंधुदुर्ग आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यावतीने शैक्षणिक साहित्यनिर्मितीसाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील सर्व कला शिक्षकांची एक दिवशीय कार्यशाळा न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे संपन्न झाली.
राज्यस्तरावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यास देण्यात आलेल्या आरोग्य आणि आहार या संकल्पनेवर आधारित नव भारत साक्षरता कार्यक्रमच्या राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत आहार आणि आरोग्य या संकल्पनांशी संबंधित भित्तीपत्रके, त्रिमित साधने, खेळ, संगीत, कविता यांच्या माध्यमातून नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत प्रौढ साक्षरांना आहार आणि आरोग्य यासंबंधी मार्गदर्शन करणारी शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यात आली. राज्यस्तर उल्लास मेळाव्यासाठी 40 पेक्षा जास्त शैक्षणिक साधने या कार्यशाळेत तयार झाली. काही कला शिक्षकांच्या मोठ्या कलाकृती पुर्ण करण्यासाठी जादा वेळ लागणार असल्याने त्यांना अधिकचा कालावधी देऊन शैक्षणिक साहित्य कार्यालयात जमा करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. कार्यशाळेतील शैक्षणिक साधनांचा स्टॉल राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यात लावला जाणार आहे.
कार्यशाळेस प्राचार्य-डाएट राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी, शिक्षणाधिकारी (योजना) प्रदीपकुमार कुडाळकर यांनी कला शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती निलीमा नाईक, उपशिक्षणाधिकारी (योजना), डाएटच्या अधिव्याख्याता श्रीमती स्नेहल पेडणेकर, तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री.रायबान हे उपस्थित होते. कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाचे सहकार्य लाभले.