रिक्षा व्यवसायिकांनी आपल्या सेवेतून पर्यटकांच्या विश्वासास पात्र ठरणे महत्वाचे : हनुमंत हेडे. मालवण येथे पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

मालवण.
मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात रिक्षा व्यावसायिक हा महत्वाचा घटक आहे. येथे येणारा पर्यटक रिक्षा व्यवसायिकांच्या थेट संपर्कात येत असल्याने रिक्षा व्यवसायिकांनी आपल्या सेवेतून आणि बोलण्यातून पर्यटकांच्या विश्वासास पात्र ठरणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पर्यटन संचालनालय कोकण विभाचाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ व पर्यटन संचालनालय यांच्या तर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या पर्यटक आदरातिथ्य मार्गदर्शनाविषयी मालवण येथील चिवला बीच हॉटेल मध्ये आज सायंकाळी पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पर्यटन संचालनालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी रिक्षा व्यवसायिकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रारंभी रिक्षा व्यवसायिकांतर्फे श्री. हेडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष कमलेश चव्हाण, महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, रिक्षा व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष पप्या कद्रेकर व इतर रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी हनुमंत हेडे म्हणाले, रिक्षा व्यवसायिकांनी आपला व्यवसाय संभाळतानाच पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या व्यवसायास विकसित केल्यास फायदेशीर ठरेलं. पर्यटकांना चांगली सेवा देतानाच त्यांच्याशी चांगले संभाषण करणे, राहणीमान चांगले ठेवणे तसेच स्थानिक पर्यटन स्थळे, हॉटेल्स व इतर सुविधा यांची माहितीही रिक्षा व्यवसायिकांनी पर्यटकांना दिल्यास पर्यटकांमध्ये रिक्षा व्यवसायिकांबद्दल विश्वास निर्माण होऊन त्याचा चांगला संदेश इतर ठिकाणी जाईल. या दृष्टीने रिक्षा व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात येईल. रिक्षा व्यवसायिकांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ जे जे उपक्रम राबवेल त्यास पर्यटन संचालनालयाकडून सहकार्य लाभेल, असेही ते म्हणाले.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने रिक्षा व्यवसायिकांचे असलेले महत्व शासनापर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. तरच शासन रिक्षा व्यवसायिकांसाठी पर्यटन दृष्ट्या काही उपक्रम राबवू शकते. रिक्षा व्यवसायिकांना पर्यटन क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शासनाकडून टुरिस्ट गाईड म्हणून मान्यता मिळून विविध योजनामधून रिक्षा व्यवसायासाठी अनुदान मिळाले पाहिजे. पर्यटन रिक्षा स्टॅन्ड निर्माण झाले पाहिजेत. पर्यटनाच्या दृष्टीने रिक्षा व्यवसायिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पर्यटन व्यावसायिक महासंघ करत असून जिल्ह्यातील सुमारे ५ हजार रिक्षा व्यवसायिकांची माहिती असणारी वेबसाईट महासंघातर्फे बनविण्यात येत आहे. ही वेबसाईट रिक्षा व्यावसायिक तसेच पर्यटकांनाही फायदेशीर ठरणार आहे. या वेबसाईटचे उदघाटन ३० ऑगस्टला नारळी पौर्णिमे दिवशी करण्यात येणार आहे, असेही श्री. मोंडकर म्हणाले.
यावेळी रिक्षा व्यवसायिकांनी देखील आपले विचार मांडत मालवणसह जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक पर्यटकांना चांगली व प्रामाणिक सेवा देत असून पर्यटकही आमच्या सेवेने समाधानी होत असल्याचे सांगितले. काही अपवाद सोडले तर रिक्षा व्यवसायिक पर्यटकांशी चांगले वर्तन करत असून व्यवसायिकांमध्ये एकी आहे, रिक्षा व्यवसायिकांच्या विविध अडचणी शासनाने जाणून घेऊन व्यवसायासाठी सहकार्य करावे, असेही रिक्षा व्यावसायिकांनी सांगितले.