मान्सून दोन दिवसात कर्नाटकात दाखल होणार.

मान्सून दोन दिवसात कर्नाटकात दाखल होणार.

मुंबई.

  मान्सून नुकताच भारताच्या मुख्य भूमी दाखल झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळात काल म्हणजेच 30 मे 2019 ला त्याचे आगमन झाले आहे. खरे तर 19 मे ला अंदमानात पोहोचलेला मान्सून 31 मे ला केरळात येणार असा अंदाज हवामान खात्याने आधी वर्तवला होता.
   पण अंदमानात आल्यानंतर मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी खूपच पोषक परिस्थिती तयार झाली आणि यामुळे तो जाहीर केलेल्या तारखे आधीच केरळात धडकला आहे. विशेष म्हणजे त्याने आज 31 मे ला देखील काही भागात प्रगती केली आहे. तसेच त्याच्या पुढील प्रवासासाठी देखील पोषक हवामान आहे. यामुळे तो लवकरच कर्नाटकात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून कर्नाटकात येणार आहे. पण राज्यात मात्र पुढील २ दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने, राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे. तसेच पुढील दोन दिवस कोकणात देखील उष्णतेची लाट येऊ शकते असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. पण, उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे.
   आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे उद्या शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच, सोमवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मान्सूनची देखील वेगवान प्रगती सुरू आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच संपूर्ण केरळ आणि लक्षद्वीप, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच काही हवामान तज्ञांनी पुढील आठवड्यात मान्सून आपल्या महाराष्ट्रात येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सून दरवर्षी महाराष्ट्रात आठ जूनच्या सुमारास दाखलं होत असतो. यंदा देखील याच तारखेच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून आगमन होण्याची दाट शक्यता आहे.