लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात.
नवीदिल्ली.
लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज शनिवारी मतदान होत आहे. देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोरी जात आहे.अखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. सकाळी सात वाजल्यापासून सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.
यात पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व ४ जागांसाठी अखेरच्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तरप्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ३ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, चंदिगढमधील एकमेव जागेसाठीही मतदान पार पडले जात आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ७ टप्प्यांचे नियोजन करण्यात आले. त्या मॅरेथॉन प्रक्रियेचा प्रारंभ १९ एप्रिलला झाला. तर १ जूनला मतदानाचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर आता याचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ४ जूनला जाहीर होणार आहे.