विभागीय नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गला एक रौप्य तर तीन कांस्यपदक.
सावंतवाडी.
नुकत्याच कोल्हापूर येथे पार पडलेल्या विभागीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमबाजांची निवड झाली होती.या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खेळाडूं सहभागी झाले होते.यामध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी एक रौप्य व तीन कास्यपदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
सदर स्पर्धा 10 मी.एअर रायफल,10 मी.पीप साईट व 10मी.एअर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. 17 वर्षाखालील गटात 10 मी.पिस्तूल प्रकारात कु.आयुष दत्तप्रसाद पाटणकर( मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी)याने 400 पैकी 374 गुणांची नोंद करत रौप्य पदक पटकाविले. याच प्रकारात 19 वर्षा खालील मुलींच्या गटात कु. राजकुमारी संजय बगळे (खर्डेकर हायस्कूल, वेंगुर्ला) कुडाळ हिने 346 गुणांसह कास्य पदक मिळवले. त्याच बरोबर 10 मी.पीप साईट प्रकारात 14 वर्षा खालील मुलांच्या गटात कु. खुशल संभाजी सावंत (भोसले इंटरनॅशनल स्कूल) सावंतवाडी याने 400 पैकी 386 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला तसेच याच क्रीडा प्रकार 19 वर्षा खालील मुलींच्या गटात कु. वैष्णवी गोविंद भांगले (राणी पार्वती देवी हाय.अँड जुनिअर कॉलेज, सावंतवाडी) बांदा हिने 400 पैकी 389 गुणांची नोंद करत रौप्य पदक पटकाविले.
पदक विजेत्या चारही नेमबाजांची निवड राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. हे सर्व खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडेमी सावंतवाडी,वेंगुर्ला आणि बांदा येथे प्रशिक्षक श्री. कांचन वसंत उपरकर यांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहेत. तसेच यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले याचेही मार्गदर्शन लाभले. विजेत्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन चे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस च्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.