कोकण रेल्वेच्या स्थानकांवर लवकरच सारथी सेवा. कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाच्या मागणीवर कोकण रेल्वे सकारात्मक.

ठाणे.
कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर सारथी सेवा पुरवण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. सारथी सेवा सुरु झाल्यास दिव्यांग प्रवाश्यांना सामानाची ने- आण करण्यास हमालांची (कुली) मदत मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्यावतीने कोकण रेल्वे मार्गावर कोकणातील रेल्वेच्या सर्व स्थानकावर सारथी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर दिल्याचे कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाच्या राजु कांबळे यांनी सांगितले.कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या विविध मागण्या व हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर दिव्यांग प्रवाशाना सारथी सेवा पुरवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने कळवलेल्या पत्रानुसार, कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवरून उतरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण सेवा सुरू आहे आणि अपंगांसाठी सारथी सेवा चिपळूण, रत्नागिरी, मडगाव, उडुपी आणि सुरतकल या पाच स्थानकांवर उपलब्ध आहे. श्रावण सेवे अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना स्टेशन हमालांच्या (कुली) मदतीने त्यांच्या सामानासह गाडीमध्ये चढण्यास किंवा उतरण्यास मदत केली जाते, तर सारथी सेवे अंतर्गत, दिव्यांग प्रवाशांना अटेंडंटसह मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाते.सध्या श्रावण सेवा आणि सारथी सेवा त्या स्थानकांवर उपलब्ध आहे जेथे स्टेशन कुली नियुक्त करण्यात आले आहेत. भविष्यात इतर स्थानकांवर स्टेशन कुली नेमण्यात येणार असल्याने कोकणातील प्रत्येक स्थानकावर लवकरच सारथी सेवा सुरू करण्यास कोकण रेल्वे सकारात्मक असल्याचे कळवण्यात आले आहे.