आचरा रामेश्वर संस्थानात रामजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

मालवण.
तालुक्यातील आचरा येथील श्री देव रामेश्वर संस्थानात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. गुढीपाडव्यापासून येथील रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवनिमित्त रामेश्वर मंदिराचा सभामंडप आकर्षक फुलांनी तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राघूविराच्या आरतीची फेरी सुरु झाली.मंदिराला नऊ फेऱ्या मारून पूर्ण झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास ह.भ.प.मिलिंद बुवा कुळकर्णी यांनी राम जन्मोत्सवाच्या उत्सवाला सुरुवात केली.आपल्या सुमधुर गीतांनी कुळकर्णी बुवांनी राम जन्माची कथा उपस्थितांना उलगडून सांगितली.दुपारी साडेबाराच्या सुमारास मंदिरातील राम जन्मोत्सवानिमित्त ठेवलेली घटिका भरली अन आसमंतात जय जय रघुवीर समर्थ ललकारी घुमली. तोफा दणालल्या, अक्षतांची व गुलालाची उधळण झाली, फुलांची बरसात झाली, वाद्ये वाजू लागली. राम जन्माचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
शाही थाटात साजरा होणारा हा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. या उत्सवासाठी आचरा पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.रामेश्वर मंदिरात सायंकाळी सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे पुणे यांचे गायन सादर झाले. त्यांना संवादिनी-राया कोरेगावकर तबला साथ- रामकृष्ण करंबेळकर यांची लाभली.
जिल्हा प्रशासनाकडून उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात आली होती. रामजन्म सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते.उन्हाचा प्रचंड उकाडा असतानाही देवाचा दर्शसास भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.यावेळी परिसरात विविध प्रकारची दुकाने, मालवणी खाजा, थंडगार पेयाची दुकानांवर भाविकांची गर्दी दिसून येत होती.