डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणांनी आत्मसात करण्याची गरज! डॉ.जयेंद्र परुळेकर यांचे प्रतिपादन; वेंगुर्ला येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
वेंगुर्ला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी अतिशय कमी कालावधीत विविध शास्त्रांच्या पदव्या संपादन केल्या.कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.त्यामुळे तरुणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी वेंगुर्ला येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वेंगुर्ला तालुका व शहर समिती आनंदवाडी वेंगुर्ला, सावित्रीबाई महिला मंडळ आनंदवाडी, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुका व दलित समाज सेवा मंडळ आनंदवाडी वेंगुर्ला, यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती उत्सव साई दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी विचारमंचावर वेंगुर्ला शहर जयंती उत्सव समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्षा मोनाली जाधव, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित समाजसेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्ष सुहानी जाधव.सामजिक कार्यकर्ते महेश परुळेकर, फुले शाहू आंबेडकर विचारमंच तालुकाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, उत्सव समिती सदस्य एन.पी मठकर, रामचंद्र आसोलकर, लवु तुळसकर आदी उपस्थित होते.
साई दरबार हॉल वेंगुर्ला येथे आयोजित जाहीर अभिवादन सभेचे उद्घाटन डॉ.जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना डॉ.परुळेकर असे म्हणले की, समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा समान विकास होण्यास मदत होईल, अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यांच्या या विचारांना अनुसरूनच शासन व प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करीत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करीत विविध शास्त्रांचे ज्ञान संपादन केले. त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या युवा पिढीने ज्ञानार्जन करून आपली प्रगती साधण्याची गरज आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द असणे आवश्यक असते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले आहे.त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे डॉ.परुळेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल जाधव यांनी बोलताना सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीस जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.तसेच उपस्थित सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश परुळेकर, फुले शाहू आंबेडकर विचारमंच तालुकाध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी आपले विचार मांडले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते वाय.जी कदम, जयंत जाधव, गौतम जाधव, देवेंद्र जाधव, महेंद्र जाधव, विकास जाधव, सुरेश जाधव, सखाराम जाधव, वामन कांबळे, कार्याध्यक्ष लाडू जाधव, अनिल जाधव, मधुकर जाधव, वासुदेव जाधव, महादेव नाईक, अमित रेडकर, तालुक्यातील ग्रामीण प्रतिनिधी तसेच धम्म बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी साई दरबार हॉल ते दाभोली नाका - बाजारपेठ ते कॅम्प ते आनंदवाडी अशी सद्भावना ऐक्य मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव, कृष्णदर्शन जाधव, प्रास्ताविक वाय.जी.कदम यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार एन.पी.मठकर यांनी मानले.