त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द.....मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई
त्रिभाषा सूत्रावरून राज्यात पेटलेले राजकीय रान शांत करण्यासाठी अखेर महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदी सक्तीच्या आरोपांना तोंड देत असलेल्या सरकारने, वादग्रस्त ठरलेले दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करत असल्याची घोषणा केली. मात्र, हा निर्णय जाहीर करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत या संपूर्ण वादाचे खापर थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले. 'ज्या अहवालाच्या आधारे हे जीआर निघाले, तो १०१ पानी अहवाल उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता,'असा दावा करत फडणवीसांनी ठाकरे गटाच्या आंदोलनावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समारचा घेतला राज्यात आम्ही मराठी अनिवार्य केली, हिंदी पर्यायी ठेवली आहे. झोपलेल्याला उठवता येत, सोंग घेतलेल्याला नाही असा निशाणानाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला. पुढे ते म्हणाले की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्यावतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार आहे. समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार सध्या याबाबतचे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करतोय असेही त्यांनी सांगितले.