साळशी धनगरवाडी ग्रामस्थ पाण्यापासून वंचित; तात्काळ नळपाणी योजनेचे काम चालू करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन.
देवगड.
तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गतं साळशी येथे नळपाणी योजनेच्या कामाची मुदत संपूनही अद्यापही काम अपूर्ण अवस्थेत आहे. मात्र सद्यस्थितीत तेथीलच एका विहिरीत पाणी उपलब्ध असूनही अधिकारी वर्गाच्या वेळकाढू धोरणामुळे साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने योजनेचे काम करावे अशी मागणी साळशी येथील ग्रामस्थांनी देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन केली.येत्या दोन दिवसात तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यादव यांनी दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवगड यांसकडून धनगरवाडी नळयोजनेकरिता विहिरीसाठी दिलेल्या जागी पाणी लागले नाही असे कळवण्यात आले होते. त्याकरिता भरपूर पाणी असलेल्या विहीरीच्या जागेचे बक्षीसपत्र झालेले आहे. त्याबाबत उपअभियंता ग्रामीण पाणी उपविभाग देवगड यांना याबाबत पत्राद्वारे कळविले असून त्यांच्याकडून कोणतीही पुढील कार्यवाही झालेले दिसून येत नाही.तसेच कामाची अद्यापही सुरुवात झालेली नाही.आम्ही राहत असलेल्या ठिकाणी अतिदुर्गम व डोंगरी भागामध्ये असून कित्येक वर्ष आम्हांला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून सध्या आम्हाला तीव्र पाणी टंचाई भासत आहे.त्यामुळे तात्काळ काम सुरु करण्यात यावे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर २ मे २०२४ रोजी उपोषणास बसू.तसेच होणाऱ्या लोकसभा निवडणूकीवरती बहिष्कार घालत आहोत.तरी आमच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ आम्हाला न्याय मिळवून द्यावा.असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी उपसरपंच कैलास गावकर, रमेश खरात,सचिन खरात, बापू खरात,लक्ष्मी खरात, वनिता खरात, मनोहर खरात, रंजना खरात, रामचंद्र खरात, प्रभाकर साळसकर, किशोर साळसकर, रुपेश गावकर,आदी उपस्थित होते.