शाळांकडून वह्या-पेन विक्रीची सक्ती.....सिंधुदुर्गातील स्टेशनरी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ.....आंदोलनाचा इशारा

शाळांकडून वह्या-पेन विक्रीची सक्ती.....सिंधुदुर्गातील स्टेशनरी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ.....आंदोलनाचा इशारा

 

सावंतवाडी

 

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील स्टेशनरी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 'आता आम्ही करायचे काय?' असा संतप्त सवाल सिंधुदुर्ग जिल्हा स्टेशनरी संघटनेने उपस्थित केला आहे. शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला.अनुदानित शाळांनी अशाप्रकारे वह्या-पेन विक्रीचा व्यवसाय करू नये, असे स्पष्ट आदेश *शिक्षण मंत्री आणि शासनाने दिलेले असतानाही ते आदेश संबंधित शाळांकडून धाब्यावर बसवले जात आहेत. खुद्द शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांनी निर्देश देऊनही काही शाळांच्या संस्थांनी थेट दुकानेच थाटली आहेत. हा सरळ सरळ नियमांचा भंग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.संघटनेने सावंतवाडीत पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. "शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचा वह्या विक्रीचा व्यापार चालणार नाही, असा स्पष्ट शासन आदेश आहे. जर या शिक्षण संस्था मंत्र्यांचे आदेश देखील जुमानत नसतील, तर या लोकांवर कारवाई करणार कोण?" असा थेट सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.हा लढा आमच्या पोटापाण्यासाठी आणि अस्तित्वासाठी असून, येत्या चार दिवसांत जिल्ह्याची विशेष बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले. तसेच कराडमध्ये या संदर्भात स्टेशनरी विक्रेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील विक्रेते कराडला जाणार आहेत.जिल्हाध्यक्ष साईशकुमार केसरकर यांनी जिल्हा परिषद शाळांमधील प्रकारांवर बोट ठेवले. काही घाटमाथ्यावरील शिक्षक जि.प. शाळांमध्ये देखील वह्या विक्रीचा धंदा करत असून मुलांवर खरेदीसाठी सक्ती करत आहेत. "शिक्षकांनी केवळ विद्यादानाचे पवित्र काम करावे, त्यांनी धंदा करू नये. धंदा करायला आम्ही विक्रेते बसलो असून आम्ही रीतसर कर देखील भरत आहोत," असा टोला लगावत त्यांनी शिक्षकांच्या व्यावसायिक भूमिकेचा निषेध केला.या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचे अध्यक्ष साईशकुमार केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर, राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर, सोहम पेडणेकर, शेखर पेडणेकर, प्रवीण आईर, सुनील केसरकर, अण्णा मठकर, संदीप सावंत, प्रसाद माधव, ऋतिक कोरगावकर, दीपक सावंत, बाळकृष्ण पेडणेकर, समीर घाडीगांवकर आणि नारायण नाईक यांसह अनेक पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.