जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 

सिंधुदुर्गनगरी

 

       जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील घरगणना आणि घरयादी तयार करण्याच्या कामात कोणतेही घर नजरचुकीने किंवा कोणत्याही कारणास्तव वगळले जाणार नाही याची विशेष दक्षता घ्या, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासनाला दिल्या.कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी परिसराला भेट देऊन त्यांनी या संपूर्ण कामकाजाची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली.जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने प्रत्येक घराची अचूक आणि संपूर्ण नोंद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी देऊळवाडी येथील रुपाली कृष्णा मसुरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना प्रक्रियेचे निरीक्षण केले. यावेळी प्रगणक व पर्यवेक्षक यांनी त्यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबाची घरगणना पूर्ण केली. घरगणना करताना विचारण्यात येणारे प्रश्न, माहिती नोंदविण्याची पद्धत आणि डिजिटल माध्यमातून माहिती संकलनाची प्रक्रिया याविषयी त्यांनी सविस्तर जाणून घेतले.यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणकांशी संवाद साधून प्रत्यक्ष कामाच्या वेळी येणाऱ्या अडचणी, नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद तसेच माहिती संकलनातील आव्हाने याबाबत सविस्तर चर्चा केली. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या कामाला ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रभावी सहकार्य मिळवून प्रत्येक घराची नोंद अचूकपणे होईल याची खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच एखाद्या घराची गणना झाली नसल्याचे आढळल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक तलाठी कार्यालयाशी, तर शहरी भागातील नागरिकांनी संबंधित नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.या क्षेत्रीय भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, पोलीस पाटील वैभव धुरी तसेच देऊळवाडी गावातील इतर प्रगणक उपस्थित होते.