महामार्गावर वाहतूक रोखल्याप्रकरणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

महामार्गावर वाहतूक रोखल्याप्रकरणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

 

बांदा

 

     गोव्यातील मांद्रे-मोरजी मार्गावर पर्यटनासाठी गेलेल्या परब कुटुंबियांना स्थानिक तरुणांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद बांदा शहरात उमटले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून युवासेनेचे पदाधिकारी सूरज परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. दरम्यान, महामार्गाच्या मध्यभागी गाडी आडवी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी सूरज परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवार रात्री पर्यटनासाठी गेलेल्या परब कुटुंबियांना गोव्यातील मांद्रे-मोरजी मार्गावर स्थानिक तरुणांनी मारहाण केली होती. या घटनेमुळे सिंधुदुर्गात तीव्र संताप व्यक्त होत होता. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास युवासेना पदाधिकारी सूरज परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली महिंद्रा कंपनीची गाडी (एमएच १० इआर ७००८) मुंबई-गोवा महामार्गावर, महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ रस्त्याच्या मध्यभागी आडवी लावली. गाडी रस्त्यावर आडवी लावल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी, "गोव्यातील गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही," अशी जोरदार आरडाओरड करत घोषणाबाजी केली. यामुळे सीमेवरील सार्वजनिक शांततेचा भंग झाला.
     याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप नाईक यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बांदा पोलिसांनी सूरज प्रकाश परब (वय ३३, रा. तळवडे), संकेत शेखर परब (वय ३२, रा. सांगली), अनिकेत शेखर परब (रा. सांगली) आणि क्लेटस फर्नांडिस (वय ३६, रा. सावंतवाडी) यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर बेकायदेशीरपणे वाहतूक रोखल्याप्रकरणी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धनंजय नाईक करत आहेत.