अधिकारी पालकमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत - परशुराम उपरकर
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या राणे कुटुंबाचे अधिकारी ऐकत नसल्याचे त्यांच्या बंधू आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पोलीस अधीक्षकांवर केलेल्या आरोपांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचे विरोधक सातत्याने सांगत होते. आता तेच पालकमंत्र्यांचे बंधू बोलत असल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.सिंधुदुर्गच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावरील कारवाईचा विषय विधिमंडळात येऊनही त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याबाबत पत्र देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून ठरावाद्वारे दिलेली माहिती खोटी होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणाकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात तातडीची यंत्रणा उभारणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील गैरव्यवस्थेबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज उठवला होता. तहसीलदार तक्रारींची खातरजमा करण्यासाठी कार्यालयाबाहेर पडत नाहीत. ते कार्यालयीन वेळेनंतरही उशिरापर्यंत कार्यालयात उपस्थित असतात, त्यामागचे नेमके कारण काय, असा सवालही उपरकर यांनी केला.कणकवली तहसीलदारांची बदली देवगड येथे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, पालकमंत्र्यांना असेच अधिकारी हवे आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच स्वतःला हिंदुत्ववादी नेते म्हणवून घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील शिव मंदिरासाठी केवळ एक लाख रुपये मंजूर केले, तर औरंगजेबाच्या कबरीसाठी अडीच लाखांचे अनुदान देण्यात आले. यावरून त्यांच्या भूमिकेतील विसंगती दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.जिल्ह्यात चौकशी लागलेले भ्रष्ट अधिकारी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असून हे दुर्दैवी असल्याचे सांगत, जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री पूर्णपणे असमर्थ ठरल्याचा आरोप उपरकर यांनी केला. ते केवळ मोठ्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात विकासकामे होत नाहीत, असेही ते म्हणाले.
konkansamwad 
