सावंतवाडी वीज कार्यालयाचा भोंगळ कारभार; काँग्रेसचे रवींद्र म्हापसेकर आक्रमक; ओटवणे ग्रामस्थांचे कार्यालयातच ठिय्या आंदोलन

सावंतवाडी वीज कार्यालयाचा भोंगळ कारभार;  काँग्रेसचे रवींद्र म्हापसेकर आक्रमक; ओटवणे ग्रामस्थांचे कार्यालयातच ठिय्या आंदोलन

सावंतवाडी

 

     ओटवणे गावातील विजेची समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने भेडसावत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर यांनी गेल्या काही दिवसांत तब्बल सहा वेळा सावंतवाडी वीज उपकार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. मात्र, प्रत्येक वेळी उपकार्यकारी अभियंता कार्यालयातून गायब असल्याचे समोर आले आहे. वारंवार चकरा मारूनही एकही जबाबदार अधिकारी भेटत नसल्याने, "अधिकारी नसलेले सावंतवाडी वीज कार्यालय थेट बंदच करून टाका," अशी संतप्त प्रतिक्रिया रवींद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केली आहे.ओटवणे गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याच समस्येबाबत जाब विचारण्यासाठी आज सकाळी रवींद्र म्हापसेकर हे ओटवणे ग्रामस्थांना सोबत घेऊन सावंतवाडी वीज कार्यालयात धडकले. परंतु, नेहमीप्रमाणे आज महावितरणच्या कार्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी अधिकारी जागेवरून गायब राहत असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा बांध सुटला. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणाचा निषेध करत रवींद्र म्हापसेकर आणि ओटवणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी वीज कार्यालयातच ठिय्या मांडला आहे.जोपर्यंत जबाबदार अधिकारी समोर येऊन ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून न उठण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.