मसुरेची कन्या अस्मिता भोगलेचा फ्रान्स, इटलीत डंका....टीईईपी' आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात घवघवीत यश

मसुरेची कन्या अस्मिता भोगलेचा फ्रान्स, इटलीत डंका....टीईईपी' आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात घवघवीत यश

 

मालवण

 

      तालुक्यातील मसुरे देऊळवाडा मठ येथील मूळ रहिवासी आणि सद्यस्थितीत मुंबई येथे वास्तव्यास असलेली विद्यार्थिनी अस्मिता प्रदीप भोगले हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबईच्या पवई येथील नामांकित 'एस. एम. शेट्टी कॉलेज'मध्ये बी.कॉम. च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिताची फ्रान्स आणि इटली येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. सुमारे १० दिवसांचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि यशस्वी दौरा पूर्ण करून ती भारतात परतली असून, तिच्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.'इकॉनॉमिक्स क्लब मुंबई'तर्फे नुकतेच 'ट्रान्सफॉर्मेटिव्ह एज्युकेशनल एक्सपिरियन्स प्रोग्राम' २०२६ अंतर्गत फ्रान्स आणि इटली या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. उच्च शिक्षण आणि जागतिक संधींचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण विद्यार्थिनींना, शिक्षकांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मुंबईतील काही निवडक आणि अत्यंत हुशार विद्यार्थ्यांमधून अस्मिता भोगले हिची या विशेष दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती.१० दिवसांच्या या विशेष कार्यक्रमात जागतिक दर्जाचे विद्यापीठीय शिक्षण, शैक्षणिक संवाद, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर भर देण्यात आला. या दौऱ्यात फ्रान्स आणि इटलीमधील पॅरिस, मासेई, नाइस, कान्स, मिलान आणि पडोव्हा यांसह ७ हून अधिक प्रमुख शहरांचा समावेश होता.अस्मिता आणि तिच्या सहकाऱ्यांनी जागतिक कीर्तीच्या सायन्सेस पो येथे संशोधक आणि शैक्षणिक अधिकाऱ्यांशी संवाद साधून अर्थशास्त्र संशोधन, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि नेतृत्व विकासाची माहिती घेतली. एक्स-मासेई विद्यापीठ येथे अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विभागाला भेट देऊन उपयोजित अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणांमधील संशोधन संधींवर चर्चा केली. पडोव्हा विद्यापीठ येथे मानवी हक्क, सामाजिक माध्यमे आणि किशोरवयीन वर्तन या विषयांवरील विशेष व्याख्यानांना उपस्थिती लावली.मिलान विद्यापीठ येथे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, उद्योजकता आणि माहिती विज्ञान या विषयांवर जागतिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवले. याशिवाय पीएसएल विद्यापीठ आणि पॅरिस १ पॅथिऑन-सॉर्बोन विद्यापीठालाही त्यांनी भेटी दिल्या.अस्मिता ही मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे संचालक आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोगले यांची कन्या आहे. या परदेश दौऱ्यादरम्यान अस्मिताने केवळ अभ्यास केला नाही, तर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्याबाबत एक संशोधन प्रबंध देखील सादर केला. या दौऱ्याचे शैक्षणिक समन्वयन शोभना पाणीकर आणि डॉ. शशी पाणीकर यांनी केले, तर जनसंपर्क विभागाच्या विभा सिंग यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि व्यापक बौद्धिक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे सांगितले.या नाविन्यपूर्ण अभ्यास दौऱ्यातून मला जागतिक स्तरावर खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग मी माझ्या भावी आयुष्यात तसेच इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्कीच करेन. असे अस्मिता भोगले हिने सांगितले. अस्मिताने मिळवलेल्या या जागतिक यशामुळे तिचे मूळ गाव मसुरे, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबईत सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.