दोडामार्ग-तिलारी मार्गावर भेडशी येथे लाकूड वाहतूक करणारा टेम्पो उलटला

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भेडशी येथे लाकूड वाहतूक करणारा टेम्पो उलटला

 

दोडामार्ग

 

    दोडामार्ग-तिलारी मार्गावरील भेडशी येथे लाकूड वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, रस्त्याच्या चुकीच्या आणि निकृष्ट कामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराला फोनवरून चांगलेच फैलावर घेतले, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या दोडामार्ग-तिलारी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. याच मार्गावरून बुधवारी जळाऊ लाकूड घेऊन एक आयशर टेम्पो दोडामार्गच्या दिशेने जात होता. भेडशी खालचा बाजार येथील पुलानजीक हा टेम्पो पोहोचला असता, रस्त्याच्या साईडपट्टीवर टाकलेल्या कच्च्या मातीच्या भरावावर गाडीचे चाक गेल्याने चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे.या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्याचे काम करताना कंत्राटदाराची मनमानी सुरू असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सूचना फलक नसल्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, काल मंगळवारी याच रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात होऊन गोव्यातील एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कंत्राटदाराला जाब विचारत कामात सुधारणा करण्याची मागणी केली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्यात आले.