श्री देव वेतोबा देवस्थानच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंतांचा गौरव.....'शेतकरी फेलो पुरस्कारा'ने सन्मानित सचिन दळवी यांचाही सत्कार
शिरोडा
श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व भक्त परिवार यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे माजी अध्यक्ष शरद परुळेकर होते.व्यासपीठावर श्री देव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ. प्रसाद साळगावकर, विश्वस्त सचिन दळवी, मानकरी मिलिंद दळवी व आरवली विकास मंडळ मुंबईचे विश्वस्त दिलीप साळगांवकर उपस्थित होते.यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यावतीने दिला जाणारा 'शेतकरी फेलो पुरस्कार' प्राप्त झालेले पुरुषोत्तम उर्फ सचिन दळवी यांचा श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब शिरोडा व र. ग. खटखटे ग्रंथालय शिरोडा यांच्यावतीनेही सचिन दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा, बा. म. गोगटे जुनियर कॉलेज शिरोडा, विद्या विहार हायस्कूल आजगांव, सेंट फ्रान्सिस झेवियर आजगांव, मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी, श्री माऊली विद्या मंदिर रेडी, श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक आणि आसोली हायस्कूल आसोली या आठ प्रशालेतील गुणानुक्रमे तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.आपल्या प्रास्ताविकात देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय यांनी मुलांच्या गुणगौरव व कौतुक सोहळ्याबद्दल सविस्तर विवेचन केले. सचिन दळवी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल माहिती देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमात शरद परुळेकर, दिलीप साळगांवकर, डॉ. प्रसाद साळगावकर, सचिन दळवी, डॉ. नयनेश गावडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार जयवंत राय यांनी मानले.
konkansamwad 
