आंबोली घाटात वादळी पावसामुळे तीन झाडे उन्मळून पडली....पोलिसांच्या तत्परतेमुळे पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका

आंबोली घाटात वादळी पावसामुळे तीन झाडे उन्मळून पडली....पोलिसांच्या तत्परतेमुळे पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका

आंबोली

 

     मान्सून पूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर अचानक आलेल्या वादळी पावसामुळे आंबोली घाटात तीन मोठी झाडे मुख्य रस्त्यावर उन्मळून पडली. या घटनेमुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आंबोली पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही वेळातच ही वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने आंबोली घाटात पर्यटकांच्या गाड्यांची प्रचंड गर्दी आहे.दरम्यान घाटातील मुख्य मार्गावर तीन ठिकाणी झाडे कोसळली. झाडे रस्त्याच्या मधोमध पडल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि पर्यटकांचा खोळंबा झाला होता.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनिष शिंदे आणि रामदास जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मदतीने युद्धपातळीवर रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले.सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून रस्त्यावरील झाडे हटवून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि वेळेत मिळालेल्या मदतीमुळे पर्यटकांनी प्रशासनाचे आणि पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.