वेंगुर्ले न. प. तर्फे एकाच दिवशी ५०० झाडे लावण्याचा संकल्प......नगराध्यक्षांसह नगरसेवक, अधिकारी कर्मचारी प्रत्येकी १० झाडे लावणार
वेंगुर्ला
वृक्ष लागवड व संगोपनासाठी वेंगुर्ले न. प. ने आगळावेगळा उपक्रम करण्याचा संकल्प केला आहे. जागतिक पर्यावरणदिनी म्हणजेच ५ जून रोजी कॅम्प परिसरात वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे ५०० वृक्ष लागवड केली जाणार आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी १० झाडे दत्तक घेऊन वर्षभर त्या झाडांचे संगोपन करून ती झाडे वाढविणार आहेत. उत्कृष्ट वृक्ष संगोपन करणाऱ्या ५ जणांना रोख पारितोषिके देऊन पुढच्या वर्षी ५ जून रोजी गौरविण्यात येणार आहे अशी माहिती, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या दिवशी सकाळी स्वच्छता मोहीम आणि दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी गडकिल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत वेंगुर्ले शहरातील डच वखार स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे असेही श्री. गिरप यांनी सांगितले. वेंगुर्ले नगरपरिषद येथे नगराध्यक्ष गिरप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेविका गौरी मांद्रेकर, नगरसेवक सचिन शेट्ये आदी उपस्थित होते.
श्री. गिरप पुढे म्हणाले की, शासनाने वेंगुर्ले नगर परिषदेला वर्षाला २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. ५ तारखेपासून टप्प्याटप्प्याने ही झाडे आम्ही शहरात जागा मिळेल तशी लावणार आहोत. फक्त झाडे लावणे हा आमचा उद्देश नसून लावलेली झाडे जगवणे यासाठीही नियोजन केले आहे.
नगराध्यक्ष यांच्यासह २३ जण १० झाडे लावणार. तसेच कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी २५ ते ३० आहेत. ते सर्वजण प्रत्येकी दहा झाडे लावतील. प्रत्येकाला लावलेली दहा-दहा झाडे वाटून दिली जातील आणि त्या नावाचा टॅग बनवण्यात येईल. त्या त्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी वर्षभर त्या झाडांची देखभाल करायची आहे. एक वर्षानंतर समितीमार्फत या सर्व झाडांची तपासणी केली जाईल. जे चांगले झाडांची देखभाल करतील त्यांना पुढच्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनी बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
वेंगुर्ले शहरातील झुलत्या पुलाजवळ समुद्र किनाऱ्यावर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीममध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छता प्रेमी सहभागी होणार आहेत. यामध्ये शहरवासीयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी यावेळी केले. तसेच ६ जून रोजी शासनाकडून गडकिल्ल्यांची स्वच्छता करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ले शहरातील ऐतिहासिक डच वखार या वास्तूमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
konkansamwad 
