सिंधुदुर्गात लवकरच उभारले जाणार भव्य पायाभूत 'काजू सुविधा केंद्र.....मनीष दळवी यांची माहीती
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने काजू फळ पीक विकास योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली असून, या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मध्यवर्ती पायाभूत काजू सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली आहे.या योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक भव्य केंद्र उभारले जाईल. या केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र, सुसज्ज काजू बाजार केंद्र, आधुनिक प्रक्रिया प्रकल्प आणि मोठ्या क्षमतेचे गोदाम यासारख्या सर्व आवश्यक पायाभूत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे स्थानिक काजू उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळणे सोपे होणार आहे.या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीसाठी किमान २५ एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू परिषदेकडून सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प एखाद्या योग्य शासकीय जागेवर उभारण्याचा मानस असून, परिषदेने तशी रीतसर मागणी शासनाकडे नोंदवली आहे. या पाच जिल्ह्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी एमआयडीसी परिसरामध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही हा प्रकल्प नियोजित टप्प्यावर आहे. लवकरच जागेचा प्रश्न सुटल्यानंतर सिंधुदुर्गातील काजू उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या या केंद्राचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला आहे.
konkansamwad 
