खासदार विनायक राऊत यांना आम आदमी पक्षाचा पूर्ण पाठिंबा : जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर.
कणकवली.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना विजयी करण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीने कामाला लागले आहेत. खासदार राऊत यांना आजचा पाठिंबा देण्याबाबतची भूमिका दिल्ली येथील बैठकीत घेण्यात आली.अशी माहिती आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत इंडिया आघाडीचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले होते.
त्यानंतर दिल्लीतील आपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे पंकज कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी आपचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, संघटकमंत्री संदीप देसाई, सहसचिव अविनाश देशमुख, जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका महाराष्ट्रात काय राहील, या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती ताम्हणकर यांनी दिली.महाराष्ट्रात आप पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी इंडिया आघाडीतील घटक पक्ष म्हणून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जागृती करावी. भाजपचा इलेक्ट्रोरल बाँड घोटळा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बेकायदा झालेली अटक याबाबत लोकांमध्ये जावून वस्तूस्थिती सांगावी. याशिवाय शिक्षण, आरोग्य, रोजगार या पक्षाच्या त्रिसूत्री धोरणाबाबत विचार करता या प्रश्नांची स्थानिक पातळीवर काय अवस्था आहे, यासंदर्भात जागृती करावी. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास अरविंद केजरीवाल यांनी दिलेली 24 तास अखंड वीज, वीज खंडित होणार नाही याची खात्री, देशभरातील गरिबांसाठी मोफत वीज, इंडिया ब्लॉक प्रत्येक ठिकाणी सरकारी शाळाच नविनीकरण,गरीब आणि श्रीमंत दोघांनाही दर्जेदार शिक्षण दिले जाईल, प्रत्येक गावात आणि परिसरात मोहल्ला दवाखाने बांधले जातील आणि प्रत्येक व्यक्तीला योग्य आणि मोफत उपचार देण्यासाठी बहु-विशेषतः रुग्णालये बांधली जातील, स्वामिनाथन अहवालानुसार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जाईल, ही आश्वासने मतदारांपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोहोचावीत,असे निर्देश पंकज कुमार गुप्ता यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.
यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागतानाच राऊत यांच्या मागील १० वर्षांतील कामगिरीचे कौतुक पंकज कुमार गुप्ता यांनी केले. तसेच विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी गुप्ता यांनी शुभेच्छा देखील दिल्या.