जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध करा : सचिन जाधव. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यांनी केली उपशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध करा : सचिन जाधव.   महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यांनी केली उपशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी.

देवगड. 

   जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा नुकतीच पार पडली.निकाल सुद्धा प्रसिद्ध झाला आहे. जिल्हा स्तरावरून या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्त्रो सारख्या ठिकाणी विमानाने प्रवास घडवला जातो.त्यामुळे एक चुरस निर्माण झाली आहे.या परीक्षेच्या निमित्ताने एक बाब पुढे येणे आवश्यक  आहे ती म्हणजे ही परीक्षा मराठी माध्यम शाळा, जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व उर्दू माध्यम शाळा या माध्यमातून होते मात्र माध्यमाप्रमाणे स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत नाही.त्यामुळे सेमी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता पुढे येत नाही.या शाळा टिकण्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी तलुकावार स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे.
   या परीक्षेचे पेपर विशेषतः गणित विषयाचा पेपर पूर्णपणे इंग्रजी भाषेत असतो खर तर इतर चाचण्या प्रमाणे तो पेपर अनुवादित असणे आवश्यक आहे या बाबत स्वतः तत्कालिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या सभेत विषय मांडला होता मात्र गत वर्षी प्रमाणे नियोजन सुरू राहिले.या वर्षी पेपर अनुवादित नसल्याने प्रजापती थोरात, उपशिक्षणाधिकारी योजना यांच्याशी फोनवर चर्चा करून किमान पुढील काळात या धोरणात बदल व्हावा अशी मागणी केली असल्याचे सचिन जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.याचे आणखी एक कारण म्हणजे अनेक शाळा सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देतात तशी प्रसिध्दी सुद्धा करीत असतात मात्र जिल्हा परिषद आयोजित या चुरशीच्या स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट होताना विशेषतः गणित पेपर मधे इंग्रजी भाषेतून पेपर देताना मुलाना अडचणीचे ठरेल, शाळेची गुणवत्ता खाली येईल या  भयाने मराठी माध्यमातून फॉर्म भरताना दिसतात.अनेक ठिकाणी सेमी माध्यमातून मोजकेच विद्यार्थी यंदा ही प्रविष्ट होताना दिसत आहेत.यातून सेमी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता कशी कळणार हा प्रश्न निर्माण होतो.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सेमी माध्यमाचे पेपर इंग्रजी माध्यमातून घेण्यास आग्रहीच असेल तर या जिल्ह्यातील तमाम सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाची गुणवत्ता यादी  स्वतंत्र प्रसिद्ध व्हावी यासाठी संघटना आग्रही आहे.