शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ला येथे विविध उद्घाटन सोहळे संपन्न.
वेंगुर्ला.
शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्या हस्ते घोडेबाव उदयान येथील स्नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ,सचिन वालावलकर,नितीन मांजरेकर,सुनील डुबळे तसेच वेंगुर्ला शहरातील विविध बचत गटातील महिला,पत्रकार व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्व उदयानांमध्ये व पर्यटन ठिकाणी छोटी कॅन्टीन उभारण्यात येवून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्यात येणार असल्याबाबत मंत्री महोदयांनी यापूर्वी सुचित केले होते त्यास अनुसरुन सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या घोडेबाव उदयान येथे स्नॅक सेंटर उभारण्यात आलेले असून वेंगुर्ला शहरातील महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नती होवून महिला सक्षमीकरणासाठी हे स्नॅक सेंटर शहरातील स्थानिक बचत गटांना नाममात्र शुल्क आकारुन चालविणेस देण्यात येणार असल्याचे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.तसेच कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ला बंदर या ठिकाणी अनेक देशी-विदेशी पर्यटक मोठया प्रमाणावर भेटी देत असतात.त्याचप्रमाणे स्थानिक मच्छीमार बांधव व महिला या ठिकाणी मासेमारी व मासे विक्री साठी ये–जा करत असतात.या महत्वाच्या पर्यटन स्थळी पर्यटक व नागरिकांसाठी स्वच्छ व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा शौचालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. हा उद्घाटन सोहळा देखील मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. याठिकाणी महिला व पुरुष नागरीकांसाठी वेगवेगळे केबीन ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येकी ४ सीट, दिव्यांगासाठी रॅम्पची सोय,अस्वच्छता तपासण्यासाठी सेन्सर्स अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी हे शौचालय परिपूर्ण आहे तसेच या शौचालयाच्या निम्म्या भागामध्ये कॉफी शॉप/ स्नॅक सेंटर चालविण्यात येणार असून यामधून प्राप्त होणा-या उत्पन्नातून सदर शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.