वेंगुर्ला - वायंगणी येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी 'कासव महोत्सवाचे’ आयोजन.

वेंगुर्ला - वायंगणी येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी 'कासव महोत्सवाचे’ आयोजन.

वेंगुर्ला.

   महाराष्ट्र शासनांच्या वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत वायंगणी बीच येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी 'कासव महोत्सव वायंगणी २०२४'चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नवजात समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे. कांदळवन सफारी, कोकणातील पर्यावरणपूरक जीवनशैलीची अनुभूती 'कोकणी रानमाणूस' यांच्यासोबत निसर्ग भ्रमंती, कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, पौराणिक दशावतार नाटक (कुर्म अवतार) असे कार्यक्रम होणार आहेत.
  शनिवार २४ रोजी सकाळी ७ वाजता मान्यवरांचे स्वागत, ७.१५ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, ७.४५ वा. मान्यवरांच्या हस्ते वाळू शिल्पातील कासवाच्या प्रतिकृतीचे फीत कापून उद्घाटन, सकाळी ८.१५ वा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडीचे उपवनसंरक्षक श्री. एस. एन. रेड्डी करणार आहेत. सकाळी ८.३० वाजता लोकसहभागातून कासव संवर्धनाबाबत 'कोकणी रानमाणूस' प्रसाद गावडे यांचे मार्गदर्शन, सकाळी ९ ते १० या दरम्यान कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल. त्यानंतर त्यांचे मनोगत होईल: सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान मान्यवरांचे मनोगत होणार आहे. सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफित दाखविण्यात येईल. दुपारी ११.३० ते १२.३० वाजता कासव संवर्धनाबाबत 'मानद वन्यजीवरक्षक' नागेश दफ्तरदार यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ३ ते ५.३० या वेळेत कोकणी रानमाणुस मांगर, होम स्टे यावर परिसंवाद व क्षेत्रभेट, सायंकाळी ५.३० ते ६ वाजता वेंगुर्ला सुर्यास्त दर्शन, सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजता महान पौराणिक दशावतार नाटक 'कुर्म अवतार' सादर होईल.
  रविवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, सकाळी ८ ते ८.३० वाजता वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम, सकाळी ८.३० ते ११.३० वाजता कांदळवन सफारी- मांडवी खाडी व निवती खाडी, सकाळी ११.३० ते १२.३० वाजता कांदळवन संवर्धनबाबत मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत किल्ले निवती भ्रमंती. सायंकाळी ६ वाजता आभार प्रदर्शन व कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कासव महोत्सवांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडीचे उपवनसंरक्षक श्री. एस. एन. रेड्डी व कुडाळ परिक्षेत्राचे वन अधिकारी संदीप कुंभार यांनी केले आहे.