तुळस येथे सप्तरंगी औषधी वनस्पतीची अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी ५ जण वनविभागाच्या ताब्यात. एकूण १२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
वेंगुर्ला.
येथील तुळस गावात सप्तरंगी झाडांची अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयात सप्तरंगी वनस्पतीची मुळे भरलेली ८ पोती व मुळे काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या अवजारांसह एकूण १२,५५० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हि घटना ७ डिसेंबर रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास घडली.
तुळस मधील वनक्षेत्रातून ५ इसम डोक्यावरुन प्रत्येकी एक अशी ५ प्लॅस्टिक पोती घेऊन येत होते पोत्यांमध्ये सप्तरंगी (Salacia Oblonga) वनाधिकाऱ्यांना आढळून आली.अधिकची चौकशी केली असता, जंगल पायथ्याशी झाडीझुडपात सप्तरंगी मुळाने भरलेली आणखी ३ पोती त्या इसमांनी अधिकाऱ्यांना काढून दाखविली. सप्तरंगी झाडाची तोड करुन त्याची मुळे खोदुन काढून विक्रीच्या उद्देशाने काढली असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्या ५ इसमांना अटक करण्यात आले असून दि.११ डिसेंबर पर्यत फॉरेस्ट कस्टडी देण्यात आलेली आहे.
या गुन्हयाचा तपास सावंतवाडी उप-वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी,कुडाळ वनक्षेत्रपाल कुंभार,सहा. वनसंरक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मठ वनपाल सावळा कांबळे, नेरुर वनपाल राठोड, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, मठ वनरक्षक सुर्यकांत सावंत, उपवडे वनरक्षक बदाम राठोड, वाडोस वनरक्षक अमोल पटेकर, माणगांव वनरक्षक अनिकेत माने यांनी केला असून तुळस वनमजूर संतोष इब्रामपूरकर तसेच स्थानिक ग्रामस्थ रमाकांत ठुबरे व जया शिरोडकर यांनी सहकार्य केले.
गुन्हयाचा तपास प्रगतीवर असून, सदर गुन्हयात आणखी आरोपीचा समावेश असून त्यांना दोन दिवसांत ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्रपाल यांनी दिली.