गोवा विधानसभा आमदार उल्हास तुयेकर यांची वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पांना भेट.
वेंगुर्ला.
राष्ट्रीय स्तरावर अव्वल नामांकन प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ‘स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ (कंपोस्ट डेपो) येथील विकसित करणेत आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रक्रिया केंद्रांची पाहणी करण्यासाठी गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास यशवंत तुयेकर, दवल्ली दिकरपाल नावेली या पंचायत समिती मतदार संघातील दिवली नावेली गावचे सरपंच संतोष नाईक, उपसरपंच सायमन कार्वालो, ग्रामपंचायत सदस्य साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्लेकर,मिशल मीरांडा,संपदा नाईक, व्ही.डी.सी.चे चेअरमन जयानंद देसाई, मेंबर दिनेश माने, रवी अमरापुरकर, नारायण कांबळी आदी पथक आलेले होते.
प्रथमतः नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या ठिकाणी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत बनविण्यात आलेल्या स्वच्छता संकल्पनेवर आधारित विविध व्हिडीओ, प्रेझेंटेशनद्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नाविन्यपूर्ण विकास कामे यांची माहिती देण्यात आली. तद्नंतर सर्वानी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मिरॅकल पार्क, सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प यांची पाहणी केली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथील Waste to Best संकल्पनेनूसार विकसित करण्यात आलेल्या Miracle Park व यमादोरी गार्डन या ठिकाणांना भेट दिली. तसेच आपल्या सहका-यांसोबत ‘स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ (कंपोस्ट डेपो) स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम शून्य कचरा (Zero Waste) संकल्पनेस अनूसरुन साजरा करण्यात आला. यावेळी स्नेह भोजनासाठी पर्यावरण पूरक पत्रावळ्या, द्रोण व ग्लास यांचा वापर करण्यात आला. यावेळी उपस्थित गोवा मधील सर्व मान्यवरांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) मधील विविध प्रकल्प पाहून गौरवोद्गार काढले व वेंगुर्ला नगरपरिषदेचे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यानंतर मान्यवरांनी कोकणी संस्कृती, विविध सण व उत्सव, वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक व पर्यटन स्थळे यांच्या हुबेहुब प्रतिकृतींसह माहिती दर्शविणा-या वैशिष्टयपूर्ण अशा स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट दिली. सदर पाहणी दौ-यामध्ये गोवा विधानसभा आमदार उल्हास तुयेकर यांच्या दौरा कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे, नगरपरिषदेचे स्वच्छता ब्रॅड अॅम्बेसडर सुनिल नांदोस्कर, शहरातील पत्रकार आणि इतर नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कचरा ही एखाद्या शहराला भेडसावणारी समस्या असते. ज्या ठिकाणाहून जाताना नागरीकांना नाकाला रुमाल धरुन जावे लागते तसेच या ठिकाणी काम करणा-या कर्मचारी यांना देखील याचा त्रास होत असतो. वेंगुर्ला शहराचा कचरा डेपो म्हणजे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे भेट दिल्यावर जे काम नगरपरिषदेने केलेले आहे त्यामुळे कचरा ही समस्या नसून उत्पन्न मिळविण्याचे स्त्रोत देखील आहे. अशा कचरा डेपो मध्ये येणा-या मान्यवर जेवणाचा आस्वाद घेवू शकतात हे बघून आश्चर्य वाटले. तसेच वेंगुर्ला प्रमाणे आपणही गोवा मध्ये असा प्रकल्प उभारण्यासाठी मार्गदर्शन घेवून प्रयत्न करणार आहे असे मत गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मांडले.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे अनेक महनीय व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत. गोव्याचे आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देवून नगरपरिषदेच्या कामांची प्रशंसा केली ही नगरपरिषदेसाठी अभिमानास्पद बाब आहे. वेंगुर्लावासियांकडून व नगरपरिषदेच्या सफाई कर्मचा-यांकडून स्वच्छतेप्रती देण्यात येणा-या अमूल्य योगदानामुळे वेंगुर्ला शहराला नावलौकीक प्राप्त झालेला असल्याचे मत मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांनी व्यक्त केले.