वेंगुर्ला निशाण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्‍याने नागरीकांना पाणी टंचाईची समस्‍या भेडसावणार नाही : मुख्याधिकारी परितोष कंकाळ.

वेंगुर्ला निशाण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्‍याने  नागरीकांना पाणी टंचाईची समस्‍या भेडसावणार नाही : मुख्याधिकारी परितोष कंकाळ.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला शहराला पाणी पुरवठा करणारा मुख्‍य स्‍त्रोत निशाण तलाव आहे. सदरच्‍या तालावाची उंची २.५० मीटरने महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी यांचे देखरेखीखाली वाढविण्‍यात आलेली आहे. वेंगुर्ला शहरात फेब्रुवारी–मार्च नंतर ठरलेली पाणी टंचाई हे समीकरण कित्‍येक वर्ष नित्‍यनियमाने गृहीतच धरण्‍यात आले  होते. पावसाळयात मुबलक पाऊस पडला तरी नियोजना अभावी त्‍याचे वाहून जाणारे पाणी यामुळे शहरातील बहुतांश भागात साधारण फेब्रुवारी मार्चनंतर टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागत असे. परिणामी वर्षभरातील आठ महिने स्‍वर्गासारखे भासणारे शहर पावसाळयापूर्वीचे चार महिने पाण्‍या अभावी वाळवंटासारखे वाटत असत. कोकणात टँकर असे विसंतीपूर्ण चित्र उन्‍हाळयात दिसत असे.वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत पाण्‍याची अडचण दूर करण्‍यासाठी अस्तित्‍वात असलेल्‍या संसाधनांचे योग्‍य नियोजन करण्‍यात आले. शहरातील सात ठिकाणाच्‍या जुन्‍या व गळती लागलेल्‍या जलवाहिन्‍या बदलण्‍यात आल्‍या व संपूर्ण शहराची तहाण भागविणारा निशाण तलावाची २.५० मीटरने उंची वाढवून सक्षम बनविण्‍यात आली.दिनांक १४ ऑगस्‍ट २०२३ रोजी निशाण तलावाचे गोडबोले गेट नगरपरिषदेकडून बंद करण्‍यात आले.  अरबी समुद्रात निर्माण झालेल्‍या कमी  दाबाच्‍या पट्टयामुळे पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे सप्‍टेंबर अखेरीस निशाण तलाव ओव्‍हर फ्लो म्‍हणजे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. सदरचे गोडबोले गेट स्‍वयंचलित असून जास्‍त पाऊस पडल्‍यास गेट काही प्रमाणात पाण्‍याच्‍या दाबाने उघडते आणि पाण्‍याचा दाब कमी झाल्‍यास परत बंद होते. यावर्षी निशाण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्‍याने शहरातील नागरीकांना पाणी टंचाईची समस्‍या भेडसावणार नाही असे मत मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले.