परुळे वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथदिंडी.

वेंगुर्ला.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त परुळे येथील श्री महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालयाकडून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. माजी राष्ट्रपती मा.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमीत्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन वाचनालयातर्फे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरचे विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. परुळे हायस्कुल येथे मुख्याध्यापक श्री.सचिन माने सर यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन या दिंडीस सुरुवात करण्यात आली. तेथून परुळे बाजार,गौरीशंकर मंदिर ते वाचनालयापर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीत मुलांनी स्वतः तयार केलेल्या पालखीतून,घोषणा देत विविध ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती आणि कलाम यांचे जीवनकार्य यावर आपले विचार मांडले. त्यानंतर वाचनालयाच्या वतीने मुलांना अल्पोपहार देऊन या ग्रथदिंडीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी परुळे हायस्कुलचे शिक्षक शिक्षिका आणि वाचनालयाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.