ओरोस येथे साडेसात लाखाचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मोठी कारवाई.
सिंधुदुर्ग.
गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. अभय नारायण केसरकर ( 43, रा. बांदा, काळसेवाडी), महादेव सुभाष नेवगी (33, रा. इन्सुली-डोबवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपये किंमतीच्या बोलेरोसह साडेसात लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे ओरोस येथे जिजामाता चौक परिसरात करण्यात आली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकॉन्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात टेम्पो तपासणी केली असता, त्यामध्ये एकुण रुपये 7,53,980 किंमतीचा गुटखा व सुंगधित तंबाखुजन्य पदार्थ मिळून आला. गाडी चालक दोघा संशयित आरोपींविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे.
अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.