हनुमंत गडावर बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

हनुमंत गडावर बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

 

सावंतवाडी

 

                सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हनुमंत गड परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, काल रात्री चौकुळ ते बांदा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

                 रमेश केनवडेकर आणि गजराज नाटेकर हे दोघे रात्री नऊच्या सुमारास आपल्या चारचाकी गाडीने चौकुळहून बांद्याच्या दिशेने येत होते. हनुमंत गडाजवळील असनिये मार्गावर आले असता, अचानक रस्त्याच्या मधोमध बिबट्या येऊन थांबला. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात बिबट्या स्पष्टपणे दिसून आला. काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली. अचानक समोर आलेल्या या 'सावज' शिकारीला पाहून गाडीतील प्रवाशांची चांगलीच गाळण उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून हनुमंत गड आणि असनिये परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक सांगत होते, मात्र काल रात्री प्रत्यक्ष दर्शन झाल्याने त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर सामसूम असते, अशातच बिबट्याचे दर्शन झाल्याने आता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. दरम्यान, या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.