निरवडेत विनापरवाना खैर लाकूड जप्त, एक जण ताब्यात; सावंतवाडी वनविभागाची कारवाई

निरवडेत विनापरवाना खैर लाकूड जप्त,  एक जण ताब्यात; सावंतवाडी वनविभागाची कारवाई

सावंतवाडी

   निरवडे-भंडारवाडी येथे वनविभागाच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून तब्बल साडेचार लाखाचे खैराचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.  या प्रकरणी कृष्णा परब (रा निरवडे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान छापा टाकण्यात आला तरी याप्रकरणी संबंधित मालवाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला नाही. त्यामुळे अधिकारी व संशयिताचे साटेलोटे असल्याचा आरोप तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी आपण वरिष्ठांकडे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, निरवडे-भंडारवाडी परिसरात मातोंडकर नामक व्यक्तीच्या घरात शेजारी मोठ्या प्रमाणात खैर लाकडाचा विनापरवाना साठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार अधिकारी सचिन शिरतुरे, महेश पाटील, गौरव राणे, वृषाली होले, रवींद्र पाटील यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी परब याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपाबाबत वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ छापा टाकून कारवाई केली आहे.त्या ठिकाणी मुद्देमाल पडून होता. त्यामुळे आम्ही तो जप्त केला. संबंधितावर गुन्हा दाखल केला. आता पुढील तपास स्थानिक वनाधिकारी करणार आहे. त्यामुळे त्या तपासात ज्या गोष्टी उघड होतील त्यानुसार गाड्या व अन्य साहित्य जप्त करण्यासंदर्भात तपास होईल, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.