सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी फिजीशियन प्राप्त
सावंतवाडी
मागील पाच वर्षांपासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेल्या फिजीशियन पदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी यांची कायमस्वरूपी फिजीशियन म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. यामुळे सावंतवाडीसह संपूर्ण परिसरातील आरोग्य व्यवस्थेला मोठा बळकटी मिळाली आहे.सावंतवाडी रुग्णालयात पूर्णवेळ फिजीशियन नसल्याने रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबोळी किंवा खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांनी मोठा लढा दिला होता. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष व रुग्ण कल्याण समिती सदस्य देव्या सुर्याजी यांनी या प्रश्नाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सातत्याने मागणी लावून धरली होती.ना. नितेश राणे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला आणि अखेर डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करून घेतली. डॉ. रेड्डी यांच्या येण्यामुळे रुग्णालयातील अद्ययावत 'मोड्यूलर आयसीयू' विभाग आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, हृदयविकारासारख्या गंभीर आजारांवर स्थानिक पातळीवर उपचार शक्य होणार आहेत.रुग्णालयात पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. विशाल रेड्डी यांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐळवे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले.दरम्यान, डॉ. विशाल शेट्टी यांच्या नियुक्तीमुळे हृदयरोग रुग्णांना स्थानिक पातळीवर तातडीने उपचार मिळतील.क्रिटिकल केअर सुविधेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभ होईल, गरीब रुग्णांचा खाजगी रुग्णालयातील मोठा खर्च वाचणार आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश आले असून, आता रुग्णांना उपचारासाठी परराज्यात धाव घेण्याची गरज भासणार नाही, असे मत सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त करत त्यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू, वसंत सावंत, मंदार सावंत यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, अभिनव फाउंडेशन आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी रवी जाधव, समीरा खलील, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम तसेच प्रा. सुभाष गोवेकर, रवींद्र ओगले, एन.बी. रेडकर, राजू केळुसकर, अण्णा महापसेकर, जितेंद्र मोरजकर आदींनीही डॉ. रेड्डी यांचे स्वागत केले.
konkansamwad 
