दोडामार्ग येथील २८ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरित
दोडामार्ग
कसई-दोडामार्ग नगरपंचायतमार्फत प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत २८ पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे. या योजनेच्या अनुषंगाने नगरपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. लाभार्थ्यांनी आपल्या अडचणी मांडाव्यात, प्रशासन त्यांचे तातडीने निराकरण करेल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच घराच्या कामाच्या प्रगतीनुसार उर्वरित हप्ते देखील लवकरच वितरित करण्यात येतील असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या पात्र नागरिकांकडे अद्याप पक्की घरे नाहीत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव नगरपंचायतीकडे सादर करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभघ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी या निमित्ताने केले आहे.
konkansamwad 
