नांदगाव येथे ट्रॅक्टरला कारची धडक
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव पावाचीवाडी येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पुणे येथील पर्यटकांच्या कारची धडक बसली. दुपारी एक वाजण्या सुमारास ही घटना घडली. यात कार चालकासह त्याची पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे.लोरे येथील संतोष रावराणे यांचा ट्रॅक्टरच्या टायर पंक्चर झाल्याने त्यांनी आपला ट्रॅक्टर नांदगाव पावाचीवाडी येथील बस थांब्यासमोर विरूद्ध दिशेने उभा केला होता. हा ट्रॅक्टर पुणे ते मालवण जाणारे कार चालक सागर शिंदे (वय ४०) यांना दिसला नाही. भरधाव वेगाने जाणारी कार या ट्रॅक्टरला धडकली. यात सागर पोपट शिंदे (४०, रा. पुणे याच्यासह त्यांची पत्नी व मुलगा यांना दुखापती झाल्या. जखमींना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात ट्रॅक्टरचे पुढील दोन्ही टायर निखळले व इंजिनचेही नुकसान झाले. तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याबाबत वैभव रावराणे यांच्या फिर्यादीनुसार हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी सागर शिंदे याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
konkansamwad 
