तर वेंगुर्ले तहसील कार्यालयाला प्रशासनाने सील ठोकावे

तर वेंगुर्ले तहसील कार्यालयाला प्रशासनाने सील ठोकावे

 

वेंगुर्ले

 

    वेंगुर्ले नगरपरिषद मालकीच्या कॅम्प येथील क्रीडा मैदानाचा भाडेकरार नूतनीकरण करण्यासंदर्भात महसूल विभागाने मुख्याधिकारी हेमंत किरुळकर रजेवर असताना घाई गडबडीत ७८,१६७ रुपये नगरपरिषद प्रशासनाकडून भरून घेतले आणि पुढील ३० वर्षाचा करार ४७ लाख रुपये भरून करावा असे आदेश दिले आहेत. याबाबत कोणतीही सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे तशाच पद्धतीने वेंगुर्ले तहसील कार्यालयाचे ५८७६० रुपये घरपट्टी येणे बाकी आहे. ती घरपट्टी येत्या ३१ मार्च पर्यंत त्यांनी न भरल्यास नियमानुसार वेंगुर्ले तहसील कार्यालयाला प्रशासनाने सील ठोकावे अशी मागणी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी केली आहे.वेंगुर्ले नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा  नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रणव वायांगणकर, गौरी मराठे, सचिन शेट्ये, गौरी माईणकर, युवराज जाधव, संदेश निकम, सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर, शीतल आंगचेकर, आकांक्षा परब, रिया केरकर, सुषमा प्रभूखानोलकर, काजल कुबल, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, सुमन निकम, सदानंद गिरप, रवी शिरसाट, प्रीतम सावंत, प्रशांत आपटे, दाजी परब यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कॅम्प येथील क्रीडा मैदान भाडेकरारचा विषय आला असता संदेश निकम यांनी हे मैदान आपल्या मालकीचे असुन सात बारावर आपले नाव आहे. त्यामुळे भाडेकराराचा विषय येत नाही. त्यावर शासन आणि नगरपरिषद प्रशासन या दोघांमध्ये १९७१ पासून होत असलेल्या चुकांबाबत माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली. ही चर्चा चालू असताना नगरसेवक प्रशांत आपटे यांनी घाई गडबडीत जिल्हाधिकारी यांच्याकडून हा विषय का घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सर्वांकडून चर्चा झाली. पूर्वी एक रुपया करार झाला होता. मध्यंतरी त्यावर काहीच प्रक्रिया झाली नाही. अचानक हे मैदान जिल्हाक्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. परंतु नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हे मैदान आमच्या ताब्यातच हवे असल्याचे सागितले. त्यावर त्यानी पुढील ३० वर्षाचा भाडेकरार करावा असे सुचविले.मुळात एक रुपयाचा भाडेकरार असताना अचानक २०२६ साली भाडेकरार करताना तो २०२४ पर्यंत केला गेला आणि भाडे करारा पोटी तब्बल ७८ हजार रुपये भरून घेतले. एवढा एक हजार पट भाडेकरार वाढवताना कोणता निकष वापरला. हे महसूल विभागाने जाहीर करावे तसेच मुख्याधिकारी रजेवर असताना आणि दुसऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडे चार्ज असताना भाडेकरार साठी एवढी घाई का केली. महसूल विभाग जर अस वागत असेल तर वेंगुर्ले तहसील कार्यालयाची घरपट्टी येत्या ३१ मार्चपर्यंत न भरल्यास तहसील कार्यालयाला सिल ठोका अशी सूचना सभागृहाने प्रशासनाला केली आहे.

    वेंगुर्ले नगरपरिषदेच्या समाजकल्याण समिती सभापती पदी युवराज जाधव यांची तर सदस्य म्हणून सुधीर पालयेकर, शीतल आंगचेवर, रवी शिरसाट आणि समिधा रेडकर यांची निवड करण्यात आली. सर्वांचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अभिनंदन केले.दरम्यान कॅम्प येथील कातकरी वस्तीतील नागरिकांसाठी २५ गुंठे जागा आरक्षित आहे. त्या जागी शबरी आवाज योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी घरकुल योजना होत नसेल तर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल योजना करण्याबाबत चर्चा झाली. याचा पाठपुरावा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. यासह रस्ते, गटार दुरुस्ती, गतिरोधक, पाणीपुरवठा यावरही चर्चा झाली.