पर्यटन हंगामात अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची कडक तपासणी मोहीम

पर्यटन हंगामात अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची कडक तपासणी मोहीम

बांदा

 


     सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि शेजारील गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ येऊ नयेत आणि त्यांची अवैध वाहतूक रोखली जावी, यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली.  स्थानिक गुन्हे शाखा आणि बांदा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी गोव्याकडून येणाऱ्या आणि जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या सर्व खासगी बस, चारचाकी गाड्या आणि इतर संशयास्पद वाहनांची श्वानपथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. विशेषतः वाहनांमधील सामान आणि प्रवाशांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.पर्यटन हंगामाचा फायदा घेऊन अमली पदार्थांची तस्करी होऊ नये आणि युवा पिढी सुरक्षित राहावी, या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आगामी काळातही अशा प्रकारची तपासणी सत्रे सुरूच राहणार असल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.