मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा; ठाकरे शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी
सावंतवाडी
तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाई भासत आहे त्यामुळे शेतकरी बागायतदार मच्छीमार आणि आरोग्य सेवेसाठी आवश्यक तो साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.तसेच तुटवडा दूर करण्यासाठी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यासह अधिकाऱ्यांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी ही मागणी त्यांनी केली आहे.श्री. राऊळ यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती तहसीलदार पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सुनील गावडे, विनोद ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गेले दोन-तीन दिवस शहरात आणि तालुक्यात पेट्रोलचा तुटवडा भासत आहे त्यामुळे आंबा काजूच्या हंगामात बागायतदार हवालदिल झाले आहेत वेळेत साठा न पोहोचल्यास आंबा खराब होण्याची भीती आहे त्यामुळे आंबा बागायतरांसह मच्छीमारांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पेट्रोल साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावी करण्यात आली.तहसीलदार पाटील म्हणाले, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पेट्रोल किंवा डिझेलची टंचाई नाही. लोक अतिरिक्त साठा भरून ठेवत असल्यामुळे ही समस्या जाणवत आहे. मात्र लोकांना पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे. आम्ही अलर्ट असून वेळोवेळी पुरवठा विभागाच्या माध्यमातून आम्ही माहिती घेत आहोत.रात्री उशिरापर्यंत पेट्रोलचा साठा येतो. मात्र लोक अतिरिक्त पेट्रोल, डिझेल घेत असल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांनीही योग्य ती काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, अशा आवाहन यावेळी त्यांनी केले.
konkansamwad 
