नागपुरात वंचित आणि काँग्रेसचा 'जनआक्रोश'; संघ मुख्यालयावर धडकला भव्य मोर्चा

नागपुरात वंचित आणि काँग्रेसचा 'जनआक्रोश'; संघ मुख्यालयावर धडकला भव्य मोर्चा

नागपूर

 

   देशातील सद्यस्थिती आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आज नागपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्तपणे काढण्यात आलेला 'विशाल जनआक्रोश मोर्चा' आज थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या महामोर्चात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या हातात पंतप्रधान मोदी आणि संघाचा निषेध करणारे बॅनर्स होते. एपस्टीन फाईलवाला पंतप्रधान देशाला नको, अशा आशयाचे फलक यावेळी विशेष लक्ष वेधून घेत होते. मोर्चाला संबोधित करताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. देशाच्या अस्मितेशी तडजोड करणारा आणि संशयास्पद प्रकरणांत नाव आलेला पंतप्रधान देशाला नको आहे, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली. या भव्य मोर्चामुळे नागपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघ मुख्यालयाभोवती कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलकांनी आपला रोष प्रभावीपणे व्यक्त केला.