आमदार केसरकरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा काँग्रेसच्यावतीने जनआंदोलन.....काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांचा इशारा
सावंतवाडी
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात सावंतवाडी आमदार दिपक केसरकर यांचे नाव आल्याने व फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीचे नाव येणे ही एक चिंतेची व लाजिरवाणी बाब आहे. आमच्या सावंतवाडीचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले असून निष्पक्षपणे एसआयटीद्वारे चौकशी होईपर्यंत आमचे स्थानिक आमदार राजीनामा देणार का? असा सवाल काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे.
सौ. वंजारी पुढे म्हणाल्या की गेले आठ दिवस अशोक खरातचे नाव भोंदूगीरी, स्रीलंपटपणा, गरिबांच्या जमिनी बळकावणे यासाठी वेगवेगळ्या व्हिडिओ व फोटोद्वारे सगळीकडे प्रसिद्ध झाले. यात त्यांचे भक्त असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एक स्त्री असूनसुद्धा ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, फोटोमध्ये सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांचे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे.आमदार केसरकर यांचे नाव देखील खास भक्त म्हणून वेगवेगळ्या फोटोद्वारे पुढे येणे ही आम्हा सावंतवाडीवासियांसाठी अतिशय लज्जास्पद बाब आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार दीपक केसरकर यांचा राजीनामा घेणार? की आमदार स्वतः देणार? असा सवाल देखील साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका होईपर्यंत सावंतवाडी येथे थांबायचे व निवडणुका संपल्यावर या मतदासंघाला पोरके करायचे अशी मनोवृत्ती असलेल्यांकडून अजून कुठली अपेक्षा करायची असा सवालही वंजारी यांनी उपस्थित केला.आमदार दीपक केसरकरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा देखील वंजारी यांनी दिला आहे.
konkansamwad 
