रत्नागिरीमध्ये भरदिवसा चोरी; दूध व्यावसायिकाच्या गाडीतून हजारोंची रक्कम  लंपास

रत्नागिरीमध्ये भरदिवसा चोरी; दूध व्यावसायिकाच्या गाडीतून हजारोंची रक्कम  लंपास

रत्नागिरी

 

     शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली असून दूध वितरणासाठी आलेल्या व्यावसायिकाच्या गाडीतून ७० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत साईप्रसाद सदानंद मुस्कर यांनी फिर्याद दिली आहे. मुस्कर हे गोकुळ दूध एजन्सीमार्फत दूध वितरणाचे काम करतात. ते टाटा सुपर एस या गाडीतून कीर्तीनगर येथील 'साई सागर' दुकानासमोर दूध देण्यासाठी थांबले होते.यावेळी ते दुकानात दूध देत असताना गाडीच्या ड्रायव्हर सीटजवळ ठेवलेली काळ्या रंगाची हॅण्डबॅग अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेली.या बॅगेत सुमारे ७० हजार रुपयांची रोख रक्कम होती. घटनेनंतर मुस्कर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.