कोकणातील आंबा, कलिंगड, मासे निर्यातीवर युद्धाचे ढग
रत्नागिरी
अलिबाग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव, माणगाव आणि कोलाड परिसरात कलिंगड पिकाला यंदा युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसला आहे. येथील कलिंगडांची निर्यात दुबई, मस्कत, कुवेत आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये होते. ती ठप्प झाल्याने कलिंगड उत्पादक आर्थिक संकटात आहेत. दरवर्षी दुबई, बहरीन, कतार, दोहा, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या आखाती प्रदेशात कोकणातील हापूस आंब्याला चांगली मागणी असते.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत हापूसची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. एकूण निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात वाशी मार्केटमधून होते. त्यापैकी ३० टक्के माल आखाती देशांमध्ये जातो. युद्ध स्थिती पुढील महिन्यात कायम राहिल्यास निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. भारतातन एकण आंबा निर्यात २९ हजार मेट्रिक टन आहे. त्यात राज्यातील निर्यात साडेपाच मेट्रिक टन आहे. अडीच मेट्रिक टन आंबा कोकणातील आहे. निर्यात ठप्प झाली तर स्थानिक बाजारात हा आंबा विकावा लागून भाव पडण्याची धास्ती आहे.कोकणातून दरवर्षी युरोप, अमेरिका, जपान, चीन, इटली यासह आखाती देशात गोठवलेले मासे निर्यात केले जातात. कोकणातून १५ ते १६ हजार टन तर महाराष्ट्रातून सुमारे ६० हजार टन निर्यात होत असते. पण युद्ध परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास मत्स्यनिर्यातीवर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरीतील लोटेसह इतर उद्योग कारखान्यांचे उत्पादन युद्धपरिस्थितीमुळे ५० टक्क्यांवर आले आहे.
konkansamwad 
