कुडाळ वनविभागाची मोठी कारवाई.....वाघनखे तस्करीचा पर्दाफाश, तिघे ताब्यात

कुडाळ वनविभागाची मोठी कारवाई.....वाघनखे तस्करीचा पर्दाफाश, तिघे ताब्यात

कुडाळ 

 

      कुडाळ वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात वन्यप्राण्यांच्या अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तीन जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहिदास हरिश्चंद्र कामत, वय ४८ वर्षे, राहणार कामतवाडी, वायंगणी, तालुका वेंगुर्ला, जो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला बस स्थानकात शिपाई म्हणून काम करतो, त्याच्यासोबत विजय रविकांत शिंदे, वय ३१ वर्षे, राहणार मुळदे, तालुका कुडाळ आणि तिसरा आरोपी मुनाफ इस्माईल मुकादम, वय ४० वर्षे, राहणार अनपूर, विजयदुर्ग, तालुका देवगड या तिघांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी रोहिदास कामत याने पैशाच्या हव्यासापोटी वन्यप्राण्यांचे अवशेष विकण्याचा प्लॅन केला होता. सावंतवाडी बस स्थानकात शिपाई म्हणून ड्युटीवर असतानाच तो या अवैध धंद्याच्या शोधात होता. याची कुणकुण लागताच वनविभागाने बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला.सुरुवातीला आरोपीने वेंगुर्ला बस स्थानकावर ग्राहकाला बोलावले आणि बारा वाघनखे देण्यासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरवला. त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी कुडाळ बस डेपो येथील काळप नाक्यावर त्याने आपल्या साथीदारांना वाघनखे दाखवण्यासाठी पाठवले. याचवेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या वनविभागाच्या पथकाने बस डेपोच्या प्रवेशद्वारावरच झडप घालून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.झडतीदरम्यान त्यांच्याकडून वाघाचा एक दातसुळा ज्याची लांबी पाच सेंटीमीटर आहे, बिबट्याची दोन नखे चार सेंटीमीटर लांबीची आणि सोन्यात मढवलेले दोन सुळेदात दोन सेंटीमीटर लांबीचे असा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे सर्व अवशेष वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची एक मधील संरक्षित प्राण्यांचे असून त्यांची शिकार करून त्यापासून मृगयाचिन्हे तयार करून विक्रीच्या उद्देशाने बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे.या प्रकरणी नेरूर तर्फ हवेलीचे वनपाल यांनी गुन्हा नोंदवला असून तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी क्रमांक एक व दोन यांना दोन दिवसांची वनकोठडी तर तिसऱ्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.ही संपूर्ण धडक कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि अतिरिक्त कार्यभार असलेले उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वात कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि चालक राहुल मयेकर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला असून जैवविविधतेने समृद्ध आहे. हा भाग व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा कॉरिडोअर असल्याने वनविभागाने शिकारीविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. अशा प्रकारची तस्करी निदर्शनास आल्यास नागरिकांनी माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले आहे.